पुणे (ता. शिरुर) रांजणगाव एमआयडीसी परिसरात तसेच गावांच्या वेशीपर्यंत सर्वत्र जुगार- मटका, गांज्या, वेश्या व्यवसाय,गुटखा,गावठी दारूविक्री असे अवैध धंदे जोमात सुरू आहेत. मात्र, पोलिस अॅक्शन मोडमध्ये येत नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल साहेबांनी पदभार स्वीकारल्यानंतर बदलाची अपेक्षा व्यक्त होत आहे.
अवैध धंद्यांवर कारवाईऐवजी पोलिस प्रशासन ‘हप्ता वसुलीत’ मग्न असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. स्वच्छ प्रतिमा असलेले पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी याप्रकरणी लक्ष घालून लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहे. पोलिसांना अनेक वेळा सजग नागरिकांनी अवैध धंदे सुरू असल्याबाबतच्या तक्रारी केल्या आहेत. पोलिसांनाही अवैध धंदे सुरू असल्याचे सापडले आहेत, मात्र कारवाई होत का नाही? असा खोचक प्रश्न नागरिक विचारत आहेत.
अवैध धंद्यांमध्ये मटका, जुगार, चक्री बिंगो,हातभट्टी दारूविक्री, गांजा विक्री वेश्याव्यवसाय गुटखा विक्रीचे प्रकार सर्वाधिक आहेत. सामान्य नागरिकांनी तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीतच हॉटेल व्यावसायिक विनापरवाना मद्यविक्री करत आहेत. अशा ठिकाणी कर्मचार्यांपासून ते वरिष्ठ अधिकार्यांपर्यंत प्रत्येकाचे वेगळे हप्ते वसूल होतात का? असाही प्रश्न विचारला जात आहे. परिसरातील पोलिस पाटलांकडून तरी तक्रारींचा अहवाल पोलिसांना प्राप्त होतो का असाही सवाल उपस्थित होत आहे. अवैध धंद्यावर पोलिस प्रशासन कशा पद्धतीने कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोलिस ठाण्यापासून थोड्याच अंतरावर असणार्या वाईन्स शॉपीतून तळीराम बाहेर पडतात आणि थेट ठाण्याच्या रस्तादुभाजकावर खुलेआम मद्य प्राशन करताना दिसतात. परिसरातील छोट्या ठेल्यांवर तसेच हॉटेलमध्येही खुलेआम दारू विक्री सुरू आहे. अनेक वेळा कारवाईही नावापुरतीच होते का? मात्र पुन्हा धंदे सुरू होऊन पोलिसांना आव्हानच दिले जात असल्याचे समोर येत आहे.