- पुणे – पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील पब, बार, रुफ टॉप हॉटेल आणि रेस्टॉरंट यांना रात्री दीड पर्यंतची वेळ ठरवून दिलेली आहे. या आदेशाचे उल्लंघन करून पहाटेपर्यंत विना परवाना साऊंड सिस्टीम वाजवीत पब बार उघडा ठेवणाऱ्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चांगलाच दणका दिला.
युनिकॉर्न हाऊस आणि एलरो या कल्याणी नगरमधील दोन पबवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी कारवाई करीत तब्बल २९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये साऊंड सिस्टिम, तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर, हुक्का पॉट आदी साहित्याचा समावेश आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यांच्यावर भादवि कलम १८८, २९१, ३४ व सिगारेट व अन्य तंबाखू उत्पादने महाराष्ट्र सुधारणा अधिनियम २०१८ चे कलम ७ (२) २०(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक अमेय अनिल रसाळ यांनी फिर्याद दिली आहे. सेरेब्रह्म आयटी पार्क बी ३, कल्याणी नगर या बिल्डिंगच्या आठव्या मजल्यावर एलरो नावाचे रुफ टॉप हॉटेल व पब चालवले जात होते. ८ एप्रिल रोजी रात्री दीड ते सकाळी पावणे सहा वाजण्याच्या दरम्यान हा पब सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा मारला आणि नेमून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ ही आस्थापना चालून ठेवून मोठमोठ्याने साऊंड सिस्टिम वाजवण्यात येत असल्याचे समोर आले.
यासोबतच पोलीस शिपाई संदीप खंडू कोळगे यांच्या फिर्यादीवरून संदीप हर्षवर्धन सहस्त्रबुद्धे (रा. शिवाजीनगर), प्रफुल्ल बाळासाहेब गोरे (वय ३०, रा. सह्याद्री हॉस्पिटल जवळ, येरवडा), रश्मी संदेश कुमार (रा. औंध), सुमित चौधरी (लोहगाव) यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी या ठिकाणावरून सात लाख ५० हजार रुपयांची साऊंड सिस्टिम, ४१ हजार १४९ रुपयांचे तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर, हुक्का पॉट, इतर मुद्देमाल असा एकूण सात लाख ९१ हजार १४९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या दोन्ही गुन्ह्यांचे तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे करीत आहेत. ही करवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर, सुनील तांबे, वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.