भारतीय रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर अर्थात टीसी होण्याचं स्वप्न अनेकांनी पाहिलेलं असतं. ही नोकरी अनेकांच्या आवडीच्या नोकरीपैकी एक आहे. ज्या व्यक्ती या नोकरीसाठी वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी लवकरच एक गुड न्यूज येणार आहे.
भारतीय रेल्वेमध्ये टीसी बनण्याची इच्छा असलेल्यांना अर्ज जमा करण्यासाठी आवश्यक माहिती द्यावी लागेल. तसंच, योग्य ती डॉक्युमेंट्स सादर करावी लागतील आणि शुल्कही भरावं लागतं. या पदांवर भरती होण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या उमेदवारांना खाली दिलेल्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.
रेल्वेत टीसी व्हायचं असेल, तर आवश्यक पात्रता
रेल्वेत टीसी होण्याची इच्छा असलेला उमेदवार कोणत्याही राज्याच्या किंवा केंद्रीय बोर्डातून सायन्स, कॉमर्स किंवा आर्ट्स शाखेतून किमान 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे.
वयोमर्यादा
रेल्वेत टीसी होण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी किमान 18 वर्षं आणि कमाल 30 वर्षं अशी वयोमर्यादा आहे. ओबीसी आणि एससी/एसटी प्रवर्गातल्या उमेदवारांसाठी वयोमर्यादेत जास्तीत जास्त सूट क्रमशः तीन आणि पाच वर्षांची आहे.
अर्ज शुल्क
तिकीट कलेक्टरच्या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरावं लागतं. महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या उमेदवारांना केवळ 250 रुपये शुल्क भरावं लागतं. सीबीटीमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांना पूर्ण रक्कम रिफंड केली जाते.
रेल्वेत टीसी होण्यासाठी निवड प्रक्रियेत काही टप्पे असतात. त्यात आधी कम्प्युटर बेस्ड टेस्ट अर्थात सीबीटी होते. त्यानंतर फिजिकल एफिशियन्सी टेस्ट अर्थात शारीरिक क्षमता चाचणी होते. त्यानंतर मेडिकल टेस्ट होते. या साऱ्या टप्प्यांतून उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला नोकरीसाठी निवडलं जातं.
अर्थातच, यासाठी आधी भरतीची अधिसूचना जाहीर होण्याची गरज असते. भरतीची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर नोकरीचं ठिकाण आणि अन्य सविस्तर माहिती मिळते. त्यानुसार उमेदवार अर्ज करू शकतात. भारतात रेल्वे हा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतला एक महत्त्वाचा घटक आहे. परवडणाऱ्या दरात प्रवास होत असल्याने रेल्वेच्या प्रवासाला बहुतांश नागरिक प्राधान्य देतात.